Menu

दिल्ली : आता काशी-मथुरा रडारवर: कायदा बदलण्याची सुब्रमण्यम स्वामींची मागणी

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या राम जन्मभूमी निकालानंतर उडालेली धूळ बसण्यापूर्वी भारतीय जनता पार्टीचे नेते व राज्यसभेचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी एक नव्या वादाला तोंड फोडले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून स्वामी यांनी Places of Worship (Special Provisions) Act, 1991, मध्ये बदल करावा, अशी मागणी केली आहे. या कायद्यातील काही तरतुदी भारतीय राज्यघटनेत दिलेल्या उपासनेच्या अधिकाराच्या विरोधात आहेत, असा त्यांचा दावा आहे.
%e0%a4%a6%e0%a4%bf%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%b2%e0%a5%80-%e0%a4%86%e0%a4%a4%e0%a4%be-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b6%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a4%a5%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a4%be-%e0%a4%b0%e0%a4%a1%e0%a4%be

1991 मध्ये तत्कालीन पी. व्ही. नरसिंहराव सरकारने पारित केलेल्या ह्या कायद्यानुसार सर्व प्रार्थना स्थळांच्याबाबत जैसे थे भूमिका घेण्यात आली आहे. याचा अर्थ असा की, अयोध्या वगळता इतर सर्व ठिकाणी ऑगस्ट 15, 1947 रोजी ची परिस्थिती “जैसे थे” (status quo) पाळली जाईल. या कायद्यान्वये कुठल्याही प्रार्थनास्थळाचे रूपांतर दुसर्‍या धर्माच्या प्रार्थनास्थळात करता येत नाही.

संघ परिवाराची अशी जुनी मागणी आहे की, अयोध्येच्या धर्तीवर काशी व मथुरासारख्या विवादित स्थळांचीसुद्धा मुक्ती व्हावी व तेथे मंदिरांचे पुनर्निर्माण व्हावे. त्यांच्याकडून असा आरोप केला जातो की, सतराव्या शतकात काशी विश्वेश्वराचे मंदिर उद्ध्वस्त करून मुघल सम्राट औरंगजेबाने तिथे मशिदीची निर्मिती केली तर मथुरेलासुद्धा कृष्ण जन्मस्थानी असे झाले. स्वामी यांनी अलीकडेच मथुरा व काशी इथल्या विवादित जमिनीचे राष्ट्रीयीकरण करावे, अशी मागणी केली होती.

याबाबत विचारले असता विश्व हिंदू परिषदेच्या एका नेत्याने सांगितले की, सध्या त्यांचा पूर्ण भर हा अयोध्येच्या राम जन्मभूमीवर राम मंदिराचे पूनर्निर्माण करण्यावर असला तरीसुद्धा त्यांनी काशी व मथुरेचा मुद्दा सोडलेला नाही. आपल्याला भारताची प्राचीन सभ्यता पुनर्स्थापित करायची आहे, असे त्यांनी म्हटले. त्यासाठी जे जे काही गमावले आहे हे ते पुन्हा मिळवू.

“आम्हाला भारताला पुन्हा विश्वगुरू बनवायचे आहे. एकेकाळी जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये भारताचा वाटा 28 टक्के होता, इथे बेरोजगारी नव्हती व सर्वजण सुखी होते. ‘सोने की चिडिया’चे दिवस आम्हाला पुन्हा आणायचे आहेत. हे करण्यासाठी आपल्या प्राचीन संस्कृतीला पुन्हा भारतात प्रस्थापित करावे लागेल. सध्या आम्ही काशी व मथुरेबाबत काहीही बोलणार नाही. कारण, आमची सर्व शक्ती ही रामजन्मभूमी मंदिराच्या उभारणीसाठी कामाला लागली आहे,” असे या विश्व हिंदू परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. विश्व हिंदू परिषदेचे प्रवक्ते श्रीराज नायर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सध्या आमचा पूर्ण भर हा राम मंदिराच्या उभारणीवर आहे, असे सांगितले.

^